Saturday, 15 March 2025

कुटुंबाचे आर्थिक नियोजन !

 कुटुंबाचे आर्थिक नियोजन !

दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुमारास देशाचा अर्थ संकल्प मांडला जातो,आणि त्यावर चर्चा सत्रे व्याख्याने वादविवाद आपण पाहतो.यंदा ही  आपल्या वित्त मंत्र्यांनी मांडला व  सध्या तरी नवीन व जुनी अशा दोन्ही करप्रणाली अस्तित्वात आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार निवडू शकता.मग गुंतवणूक  करून कर वाचवा किंवा सरळ उत्पन्नाच्या प्रमाणात लागू होणारा कर भरा असा सोपा उपाय आहे.आपली वाटचाल विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे चालू आणि पहिल्या पाच प्रमुख राष्ट्रांमध्ये आपण आहोत ही अभिमानास्पद गोष्ट नक्कीच आहे.

आपल्या वडिलधाऱ्या मंडळीनी आपल्याला उत्पन्नाच्या काही प्रमाणात बचत ही झालीच पाहिजे असे बिंबवले आहे. परंतु जशी जशी प्रगती आहे सध्याच्या युवापिढी मध्ये रोज कमवा आणि सर्व खर्च करा ही नवीन वृत्ती वाढत चालली आहे ,पण ही वृत्ती खूप घातक आहे,

आपले एकुण मासिक जमा खर्चाचे गणित मांडले तर साधारण

               खर्च = उत्पन्न  

आणि उत्पन्न कमी असेल तर

          खर्च= उत्पन्न+कर्ज  (क्रेडिट कार्ड वगैरे)असे दिसते  खरेतर 

उत्पन्न  वजा बचत = उरलेल्या पैशातून खर्च  असे पाहिजे.

म्हणजे आपण जेवढे कमावतो त्यातून काही भाग  बचतीसाठी बाजुला  काढलाच पाहिजे  आणि मग उरलेल्या पैशातून दैनंदिन खर्च केला पाहिजे, मध्यमवर्गीय कुटुंबाने आपल्या उत्पन्नाच्या  अंदाजे कमीत कमी 27 ते 30 %  आपण आपले पैसे नाहीत असे समजून बाजूला काढले पाहिजेत.मी गेली दोन दशकं आर्थिक क्षेत्रात कार्यरत आहे, त्यामुळे शिस्तबद्ध बचत केल्यामुळे होणारे फायदे हे कितीतरी लोकांना घेताना पाहिले आहे, आणि बचत न  केल्यामुळे होणारी ओढाताण , त्रास पण बऱ्याच कुटुंबांचा पाहिला आणि अनुभवला पण आहे.तहान लागल्यावर विहीर खणून उपयोग होत नाही.

सांगण्याचा मुद्दा इथे असा की जरी तुम्हाला कर भरायचा नसला किंवा  वाचत असला  तरी तो पैसा तुम्ही जास्त खर्च न करता बचत केला पाहिजे.का ते आपण पाहूया.

साधारण एक मध्यमवर्गीय कुटुंबाचे आकारमान जर पाहिले तर घरात नवरा बायको दोन मुले आणि आई वडील असे असतात.घरामध्ये साधारण दोन व्यक्ती कमावते असतात आणि इतर त्यांच्यावर अवलंबून असतात. आर्थिक नियोजन ची सर्वसामान्य माणसांनी करायची पहिली पायरी म्हणजे,सर्वप्रथम जर आपल्यावर म्हणजे कमावत्या व्यक्तीवर जर कुटुंब आर्थिकदृष्ट्या अवलंबून असेल तर न होवो त्या व्यक्तीस काही झाले तर कुटुंबातील व्यक्तींची  आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाची तारांबळ आर्थिकदृष्ट्या तरी होणार नाही याची काळजी घेणे हे कमावत्या व्यक्तीचे प्राधान्य असले पाहिजे.,आणि त्या करिता दीर्घ मुदतीचा विमा हा (टर्म इन्शुरन्स)उपयोगी पडतो. थोडक्यात जसे झाडाच्या भोवती कुंपणाची भिंत झाडाचे रक्षण करते तसे आपण एक पैसारूपी संरक्षण कवच  म्हणा किंवा भिंत म्हणा आपल्या कुटुंबासाठी तयार केले पाहिजे.

पाच वर्षापूर्वी कोविड 19 ने आरोग्यविमा नसला तर दवाखान्यांमध्ये बँके तले पैसे कसे संपतात प्रसंगी पैसा  नसले  तर काय काय करावे लागू शकते हे सर्वांना माहीत आहे, त्यामुळे तुम्ही जरी ठणठणीत ,रोज टेकडी रविवारी सिंहगड चढत असला तरी आपल्या संपुर्ण कुटुंबाचा आरोग्यविमा मेडिक्लेम हा कमीत कमी दहा पंधरा लाखाचा असला म्हणजे वेळप्रसंगी आपण  दवाखाना औषध उपचार  करू शकतो पैशामुळे अडणार नाही ,कर्जबाजारी होण्यापासून वाचू शकतो,आणि निर्धास्त राहू शकतो.

आज मितीला आपला व्यवसाय किंवा खाजगी नोकरी असेल तर कधी उत्पन्न वाढेल अथवा थांबेल हे सांगता येत नाही,त्यासाठी आपण न हो असे काही झाले तर कमीतकमी चार ते पाच महिन्याचा खर्च हा इमर्जेन्सी फंड जवळ राखून ठेवावा.

ह्यानंतर आपल्या आयुष्यात मधील पुढे येणाऱ्या गरजा ओळखून त्यासाठी तरतूद करणे पण खूप आवश्यक ठरते. जसे मुलांचे शिक्षण, लग्नकार्य , निवृत्तीनंतर चे जीवन,आजारपण , फॅमिली सहल यासाठी पण विचार करून नियोजन करणे आवश्यक असते. आज अन्न वस्त्र निवारा मोबाईल याबरोबरच स्वतः: चे वाहन सुधा वेळेत पोचण्यासाठी आवश्यक गरज आहे.दुचाकी/ चारचाकी आपण साधारण 7 ते 10 वर्षांनी बदलतो मग त्यासाठी पैसे लागतात अशी अनेक उदाहरणे आहे ज्यासाठी पैसे हे लागतात,त्याकरिता पैसे  कर्ज काढुन व्याजाने घेतो ,पण जर बचत करून साठवलेले  असतील तर हप्त्याचा ताण आपल्या मासिक खर्चावर येणार नाही. आपले  वाचवलेले पैसे आपल्यासाठी काम करतात हा विचार केला पाहिजे.

मराठी मध्ये एक म्हण आहे " म्हातारपणी सगळ्यात जास्त ओझे असते ते..... रिकाम्या खिशाचं  "  त्यामुळे आपण आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी सन्मानाने राहायचे का कुणावर अवलंबून रहायचे ह्याचा विचार आणि त्यासाठी तरतुद करणे आवश्यक आहे.

मित्रानो इथे हे सगळे मांडून तुम्हाला घाबरवण्याचा माझा उद्देश नाही. आर्थिक नियोजन हे नुसते एकाने करायची गोष्ट नाही तर सपूर्ण कुटुंबाचा सहभाग असायला हवा, म्हणजे कमावणारे जरी एक दोघे असले तर सर्वांनी एकत्र बसून कुटुंबाच्या एकूण खर्चाचे गणित मांडले पाहिजे,माझे वडील नेहमी एक हिंदीतली म्हण सांगायचे. "पैसा फेकना है तो कुर्वे (विहीर ) मे ..फेको  लेकीन गिनके और सोच के फेकों ! म्हणजे पैसे कसेही खर्च करून नका आणि खर्च करताना विचार करून खर्च करा. "Money saved is money earned" ह्याप्रमाणे प्रत्येकांनी खर्च करताना हा खरोखर आवश्यक आहे का ह्याचा विचार करावा .मी माझ्या प्रशिक्षण वर्गात एक उदाहरण नेहमी सांगतो , एकदा एका ऑफिसमध्ये सहलीचे आयोजन करायचे असते,पण मर्यादित बजेट असते,तेव्हा कमीतकमी पैशांमध्ये जास्त छान आणि माफक खर्चामध्ये ह्यासाठी सूचना मागवतात,त्यावेळी सर्व जण त्यांना माहिती असलेली व कमी पैशात चांगले ठिकाण सुचावतात, मग काहीजण आपल्या ओळखीचा उपयोग करून घेतात, थोडक्यात स्वस्त पण मस्त होण्यासाठी प्रत्येक जण हातभार लावतो.ह्याच प्रमाणे आपल्या घरासाठी जर आपण योग्य पद्धतीने एकत्र बसुन आर्थिक नियोजन केले तर आनंदी हसत खेळत जगू शकतो,मग विचार कसला करता,सर्वांनी एकत्र गप्पा मारा,कुटुंबाच्या  हितासाठी घरातील खर्च आणि बचत कुठे होऊ शकते याचे नियोजन करा.आणि हे वाचवले पैसे योग्य ठिकाणी अती लोभ न ठेवता सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करा.आपल्या आत्ताच्या  आप्तेष्टांना पण मार्गदर्शन करा आणि जेंव्हा मी स्वतः माझ्या घरातील आर्थिक नियोजन आधी केले आहे आणि तुम्हाला ही त्याचा तुम्हाला ही फायदा होईल असे सांगितल्यावर त्यांचा विश्वास संपादन करता येतो.आज  कुटुंबाचे आर्थिक नियोजन करण्यासाठी आणि  लोकांना उपयुक्त अशा योजना असतात त्यासाठी  आपल्या बचत ,गुंतवणूक आणि विमा सल्लागारशी चर्चा करणे किंवा तज्ञ व्यक्ती चे मागदर्शन घ्यावे,कुटुंबातील प्रत्येक  सदस्याने ते आपल्या घरासाठी पुढाकार घेतला पाहिजे. परत भेटू  तो पर्यंत नमस्कार आणि वाचल्याबद्दल धन्यवाद आता कृतीची अपेक्षा

शुभम भवतु!!

आपला च 

शिरीष शरदराव पाटील

पुणे

भ्रमणध्वनी :98903 33611

शिरीष शरद पाटील हे सध्या बँक ,आयुर्विमा क्षेत्रामध्ये व्याख्याते ,मार्गदर्शक सल्लागार म्हणून काम करतात, त्यांची स्वतः ची Three Dimensions Training & Development  ही संस्था प्रशिक्षण क्षेत्रा मध्ये अग्रगण्य आहे गेली 12 वर्षापासून बऱ्याच बँक ,विमा कंपनी, आर्थिक संस्था मध्ये त्यांनी आपले प्रशिक्षण वर्ग घेतले आहेत. अधिक माहिती साठी

मोबाईल: 9890333611

email: shirishp2211@gmail.com




2 comments:

  1. खूप मोलाची आणि मार्गदर्शक माहिती! आर्थिक नियोजन प्रत्येक कुटुंबासाठी अत्यावश्यक आहे, आणि तुमच्या लेखाने हे अत्यंत स्पष्टपणे पटवून दिलं. शिस्तबद्ध बचत आणि योग्य गुंतवणुकीचे फायदे खूप महत्त्वाचे आहेत.

    मीसुद्धा हे पाहिलं आहे की अनेक कुटुंबांमध्ये आर्थिक नियोजनाअभावी अनपेक्षित खर्चांमुळे मोठी अडचण निर्माण होते. फक्त बचत करणे पुरेसे नाही, तर ती योग्य ठिकाणी गुंतवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. विविध जोखीम पातळ्यांनुसार गुंतवणुकीचे नियोजन करून दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळवता येते.

    या लेखाने पुन्हा एकदा आर्थिक शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. पुढील लेखनासाठी शुभेच्छा! 👍😊

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल धन्यवाद...खूपखूप आभार

      Delete